बनवा तुमचे २०१८-१९ चे आर्थिक कॅलेंडर
एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होते आणि तुम्हाला तुमचे भावी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन संधी मिळते. तसेच या सुमारास आर्थिक घडी नीट करण्याची आणखी कारणे असू शकतात. ती म्हणजे पगारवाढ, वार्षिक बोनस आणि त्याहून महत्वाचे म्हणजे गेल्या वर्षीच्या घडामोडींपासून मिळालेला धडा. जर मागील आर्थिक वर्षात तारखा चुकल्यामुळे तुम्हाला भुर्दंड बसला असेल, तर या वर्षी तसे व्हायला नको म्हणून आताच तयारी सुरू करणे गरजेचे आहे. त्यामुळे खाली दिलेल्या तारखांकडे पाहून स्वतःच्या कॅलेंडरचे योग्य ते नियोजन करुन घ्या.
एप्रिल
नवीन बजेटमधील योजना १ एप्रिल पासून लागू होतात. त्यामुळे तुम्हाला तुमची कर-बचत योजना नवीन नियमांप्रमाणे करावी लागेल. याचा फायदा तुम्हाला २०१८-१९ च्या आर्थिक वर्षाचा मिळकत कर रिटर्न भरताना होईल. जर तुम्ही उन्हाळ्याच्या सुटीत फिरायला जाणार असाल तर आत्तापासून त्याची तयारी सुरू करून सूट (डिस्काउंट) आणि इतर ऑफर्सचा फायदा घ्या. अशाने तुम्हाला ऐन वेळी अधिक पैसे भरावे लागणार नाहीत. तसेच जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणार असलात, तर त्याची किंमत एकूण पोर्टफोलिओच्या १५ टक्क्यांहून जास्त होणार नाही याची खात्री करून घ्या.
मूल्यमापन म्हणजेच तुमची बढती एप्रिलमध्ये सुरू होते आणि बहुतांश लोकांना मे महिन्यापासून पगारवाढ मिळण्यास सुरूवात होते. वार्षिक बोनससुद्धा याच दरम्यान मिळत असतो. या अधिक पैशाचा उपयोग तुम्हाला कर्ज कमी करण्यासाठी आणि पद्धतशीर गुंतवणूक करण्यासाठी करून घ्यायला हवा. त्यामुळे कर-मोसमाच्या शेवटी घाईने केलेली गुंतवणूक तुम्ही टाळायला हवी.
जून
वर्ष २०१८-१९ साठी अॅडव्हान्स टॅक्सचा पहिला हप्ता भरण्याची शेवटची तारीख १४ जून असते. तसेच तुमच्या नियोजकाकडून फॉर्म १६/१६ ए घ्या आणि तपासून पाहा. फॉर्म १६ मध्ये काही चुका असल्यास आयटीआर दाखल करताना पुस्तीसाठी दस्तऐवज जोडा.
जुलै
हा फार महत्वाचा महिना आहे. कर निर्धारण वर्ष २०१८-१९ साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. आयटीआर वेळेआधी दाखल करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे शेवटच्या टप्प्यात तुमची धावपळ होणार नाही. जर ३१ जुलैला आयटीआर दाखल केला गेला नाही तर तुम्हाला काही कर-लाभांना मुकावे लागू शकते. या कर निर्धारण वर्षापासून तुम्हाला उशीरा दाखल करण्याचा दंड कमाल १० हजार एवढा आकारला जाऊ शकतो.
ऑगस्ट
या महिन्यात तुम्हाला तुमच्या आर्थिक सल्लागारासोबत बसून अर्धवार्षिक आढावा घेतला पाहिजे. या वेळी तुम्ही सणासुदीच्या खरेदीसाठी मॉन्सून ऑफर्स सुद्धा पाहू शकता.
सप्टेंबर
अॅडव्हान्स टॅक्सचा दुसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर असते. या वेळी आपला क्रेडिट स्कोअर पाहून घ्या, अर्धवार्षिक बँक स्टेटमेंट पडताळून पाहा आणि तुमच्या कर्जाचे हप्ते नीट जमा होत असल्याची खात्री करून घ्या. काही चुका आढळल्यास त्या सुधारून घ्या.
ऑक्टोबर
हा सणासुदीचा काळ असल्यामुळे तुम्हाला या महिन्यासाठी वेगळे बजेट करावे लागू शकते. खरेदी करताना वाहून जाऊ नका. मोठी खरेदी करण्यासाठी बचतीचा पैसा वापरू नका. बजेटच्या बाहेर जाऊन खरेदी करणे पुढील नियोजन बिघडवणारे ठरु शकते.
नोव्हेंबर
दिवाळीचा आनंद घ्या आणि बजेटकडे नक्की लक्ष ठेवा. नवीन गुंतवणुकींसाठी दिवाळी शुभ मानली जाते, तेव्हा अधिक पैसे असल्यास नवीन गुंतवणूक सुरू करा.
डिसेंबर
अॅडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर असते. तुम्ही जर अजून आयटीआर दाखल केला नसेल, तर ५ हजारपर्यंत दंड भरून तुम्ही तो ३१ डिसेंबर पर्यंत दाखल करू शकता. यानंतर आयटीआर दाखल करण्यासाठी तुम्हाला १० हजार एवढा दंड लागू शकतो.
जानेवारी
आपल्या नियोजकाकडे कर-बचत गुंतवणुकींची कागदपत्रे वेळेत दाखल करून अनावश्यक कर-कपातीपासून दूर राहा. यावेळी तुम्ही आपल्या कर-बचतीचा आढावा घेऊ शकता आणि गरज असल्यास गुंतवणूक वाढवू शकता.
फेब्रुवारी
पुढच्या वर्षी २०१९ मध्ये केंद्रीय निवडणुका होणार असल्यामुळे फेब्रुवारीमध्ये संपूर्ण बजेट येणार नाही. तरीही शासनाच्या निर्णयानुसार हंगामी बजेट येण्याची शक्यता असते. त्यात येणाऱ्या बदलांकडे लक्ष ठेवा, कारण त्यामुळे तुमची कर-बचत किंवा इतर वैयक्तिक अर्थकारणावर प्रभाव पडू शकतो.
मार्च
वर्ष २०१८-१९ साठी अॅडव्गान्स टॅक्सचा शेवटचा हप्ता भरण्याची शेवटची तारीख १५ मार्च असते. कर-लाभ घेण्यासाठी आरोग्यविमा आणि आयुर्विमा पॉलिसींचे प्रीमियम भरण्याची शेवटची तारीख ३१ मार्च असते. आपली वित्तीय कामांची यादी तयार करताना ती तुमच्या वित्तीय उद्दिष्टांना पूरक आहे की नाही याचे लक्ष ठेवा. आपली गुंतवणूक-नीति आणि कर-योजना या दोन्ही अखंड सुरू ठेवा...
Jayshil Katkar
Mobile: 7709360111 | 9619378999
Skype: jayshil.katkar
Blog: http://thejaysheelkatkars.blogspot.in/
Store: https://thejayshil.wooplr.com/
...
Comments
Post a Comment